Ad will apear here
Next
जीवनदायिनी... रक्षणकर्ती...
आपल्या माणसांची सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी जिवापाड प्रयत्न करणं, हा स्त्रियांचा जन्मजात गुण. शिक्षणानं जाणिवा समृद्ध झाल्यानंतर त्यांनी समाजाची सुरक्षा, स्वास्थ्य यासाठीही काम सुरू केलं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर, त्या क्षेत्रातही स्त्रियांनी आपलं कौशल्य सिद्ध केलं. धैर्य, धाडस आणि कणखरपणा यांचं प्रत्यंतर देणाऱ्या महिलांची माहिती पाहू या ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या पाचव्या भागात...
...................
डॉ. स्नेह भार्गव :
डॉ. स्नेह भार्गव यांनी दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज’मधून वैद्यकीय पदवी आणि लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ रेडिओलॉजिस्ट’मधून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात ‘एम्स’मध्ये तीस वर्षं प्राध्यापक म्हणून काम केलं. ‘एम्स’च्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत. भारतीय वैद्यक परिषदेच्या नैतिकता समितीच्या अध्यक्षा आणि वैद्यकीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. भारत सरकारनं ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेचा गौरव केला आहे. 

राजेश्वरी चटर्जी : 
राजेश्वरी चटर्जी या कर्नाटकमधील पहिल्या महिला अभियंता आणि बेंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या पहिल्या महिला प्राध्यापक होत्या. त्यांनी ‘मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग आणि अँटेना’ या विषयात संशोधन केलं. त्यांच्या संशोधनाचा आधार घेऊन बरेच शोधनिबंध आणि पुस्तकं लिहिली गेली. त्या मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग आणि अँटेना इंजिनीअरिंग क्षेत्रात संशोधन करणाऱ्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ होत्या. त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना माउंटबॅटन पुरस्कार, जगदीशचंद्र बोस स्मृती पुरस्कार आणि रामलाल वाधवा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

डॉ. एस. पद्मावती :
रंगूनच्या मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी घेतलेल्या डॉ. पद्मावती या भारतातील पहिल्या महिला हृदयविकारतज्ज्ञ. त्यांनी लंडन, स्वीडन आणि अमेरिकेत वैद्यकीय शाखेतलं उच्च शिक्षण घेतलं. ‘ऑल इंडिया हार्ट फाउंडेशन’ ही संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारतात हृदयविकारावर उपचार करणारी सर्वोत्तम संस्था असावी, या उद्देशानं त्यांनी ‘नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. 

साजिदा खान :
साजिदा खान गेली दहा वर्षं चित्रपटसृष्टीत ऑडियो इंजिनीअर म्हणून काम करत आहेत. ‘आडवी ना थालिरोह’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटासाठी त्यांनी ऑडिओ इंजिनीअर म्हणून काम केलं आहे. गायिका म्हणूनही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. व्यावसायिक ऑडिओ इंजिनीअर म्हणून काम करताना त्यांनी चित्रपटांचं डबिंग, साउंड इफेक्ट, पार्श्वसंगीत, ऑडिओ मिक्सिंग यासारखी अनेक कामं केली आहेत. तेलुगू आणि तमिळ भाषेत त्यांनी चित्रपटाबरोबरच गाण्यांचे अल्बम्स, जाहिराती, टीव्ही मालिका, माहितीपट यांसह आकाशवाणीसाठी काम केलं आहे. 

कमला सोहोनी :
कमला सोहोनी या विज्ञान शाखेतील पीएचडी मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये शिक्षण घेणाऱ्याही त्या पहिल्याच विद्यार्थिनी. उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशांतील विविध विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी मुंबईतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख म्हणून काम केलं. देशातल्या विज्ञान संशोधन संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. 

चंद्राणी प्रसाद वर्मा :
भारतातल्या पहिल्या खनिज अभियंता असलेल्या डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा यांनी ‘खनिज आणि खनिज सर्वेक्षण’ या विषयात एम. टेक. आणि नंतर पीएचडी केली आहे. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या डॉ. वर्मा सध्या नागपूरमधील खनिज संशोधन केंद्रात प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. कोळसा आणि धातूंच्या खाणकामाशी संबंधित रॉक मेकॅनिक्स आणि न्यूमरिकल मॉडेलिंग या क्षेत्रात त्यांनी बारा वर्षं काम केलं आहे. 

अरुणाराजे पाटील :
अरुणाराजे या चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या, लेखक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. १९६९मध्ये पुण्यातील ‘एफटीआयआय’मधून प्रशिक्षण घेऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला तंत्रज्ञ आहेत. महिला सक्षमीकरणाबाबत आग्रही असणाऱ्या अरुणाराजेंनी आपले बहुतेक माहितीपट आणि फीचर्समधून महिलांच्या समस्या मांडल्या आहेत. 

डॉ. इंदिरा हिंदुजा :
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी १९८९मध्ये वंध्यत्व निवारणासाठी आयव्हीएफ केंद्र सुरू केलं. सहा ऑगस्ट १९८६ रोजी त्यांनी भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती केली. देशात यशस्वी झालेला पहिला टेस्ट ट्यूब बेबी प्रयोग त्यांनी केला. भारत सरकारनं ‘पद्मश्री’ आणि महाराष्ट्र सरकारनं ‘धन्वंतरी’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

टेसी थॉमस :
‘मिसाइल वुमन’ आणि ‘अग्निपुत्री’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस देशाच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. अग्नी क्षेपणास्त्र प्रकल्पात सुरुवातीपासूनच सहभागी असलेल्या थॉमस यांनी अग्नी चार आणि अग्नी पाच या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या क्षेपणास्त्र निर्मितीत सहभागी असणाऱ्या देशातील तिन्ही क्षेपणास्त्र प्रयोगशाळांचं प्रमुखपद त्यांनी भूषवलं आहे. 

मेरी पूनन ल्युकॉस :
स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ मेरी पूनन ल्युकॉस या भारताच्या पहिल्या शस्त्रक्रियातज्ज्ञ होत्या. त्यांनी क्षयरोग आणि एक्स रे तपासणी केंद्रं सुरू केली. तत्कालीन त्रावणकोर राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. राज्याच्या पहिल्या महिला लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. १९७५मध्ये सरकारनं पद्मश्री प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. 

प्रिया झिंगन :
१९९२मध्ये भारतीय लष्करात दाखल होणारी पहिली महिला म्हणजे मेजर प्रिया झिंगन. मूळच्या शिमल्याच्या असलेल्या प्रियाने १९८८मध्ये थेट लष्करप्रमुखांनाच पत्र लिहिण्याचे धाडस केले होते. महिलांनाही लष्करात दाखल होण्याची संधी द्यावी, अशी मागणी या पत्रात तिने केली होती. तिच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर, तिनं चेन्नईच्या ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी’तून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि ती लष्कराच्या ‘जज अॅडव्होकेट जनरल’ विभागात दाखल झाली.

अंजू मंगला : 
अंजू मंगला यांनी २०१३मध्ये तिहार तुरुंगात महिला कैदी विभागाच्या अधीक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. अत्यंत सकारात्मक विचारसरणीनं, प्रभावशाली काम करणाऱ्या अंजू यांची २०१६मध्ये तिहार तुरुंगाच्या पुरुष कैदी विभागाच्या अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुरुष कैदी विभागाच्या अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या त्या देशातल्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. तुरुंगातल्या कैद्यांसाठी त्यांनी अनेक पुनर्वसन आणि सुधारणा कार्यक्रम राबवले. त्यांना साक्षर बनवणं, योगशिक्षण देणं, रोजगार प्रशिक्षण देणं, त्यांच्यासाठी खेळ आणि अन्य स्पर्धा-कार्यक्रम घेणं, तसंच अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करणं, यांसारखे कार्यक्रम त्यांनी राबवले. पोलिस महासंचालकांनी सन्मानपदक देऊन त्यांच्या या कामगिरीचा गौरव केला आहे. 

हर्षिणी कण्हेकर :
अग्निशामक दलाची देशातली पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या हर्षिणी कण्हेकर यांनी महिलांना एका नव्या क्षेत्राची ओळख करून दिली आहे. नागपूरच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेचं शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय छात्रसेनेत प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच काही तरी वेगळं करायचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यामुळे एमबीए करत असताना करिअरच्या वेगळ्या वाटा शोधत, त्यांनी फायर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश परीक्षा दिली. या प्रवेश परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालयातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. मुंबईत काम करताना त्यांनी आगीत सापडलेल्या अनेकांचा जीव अत्यंत कौशल्यानं वाचवला आहे. 

रुवेदा सलाम : 
काश्मीरमध्ये शांतता नांदल्यास तिथला विकास अधिक वेगानं होईल, अशा विश्वासानं आपलं कर्तव्य बजावणाऱ्या रुवेदा सलाम, काश्मीरमधल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत. काश्मिरी तरुणांना पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण देण्याचं काम त्या करतात. चेन्नई आणि कोईमतूर इथंही पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. 


धन्या मेनन : 
देशातली पहिली सायबर गुन्हे तपास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या धन्या मेनन सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्याचं कामही करतात. देशभरातल्या सुमारे चारशे शाळांमधून त्या यासाठी काम करतात. मोबाइल फोन, इंटरनेट आणि समाजमाध्यमांवरच्या फसवणुकीपासून सावध कसं राहावं, याचं शिक्षण त्या लोकांना, विशेषकरून तरुण आणि किशोरवयीन मुला-मुलींना देतात.

नीरू चढ्ढा : 
सागरी कायद्यांबाबतच्या आंतरराष्ट्रीय लवादाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान नीरू चढ्ढा यांना मिळाला आहे. त्या देशातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञांपैकी एक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख कायदे सल्लागार म्हणून काम केलेल्यादेखील त्या पहिल्याच महिला आहेत. तब्बल पंचवीस वर्षं सरकारसाठी आंतरराष्ट्रीय कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या नीरू चढ्ढा यांनी अनेक द्विपक्षीय चर्चा आणि परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

एम. फातिमा बीवी : 
एम. फातिमा बीवी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम केलेल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. न्याय क्षेत्रात उच्च पद मिळवणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला असण्याचा मानही त्यांचाच. निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्य आणि तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून काम केलं. त्यांच्या कामाच्या सन्मानार्थ त्यांना ‘महिला शिरोमणी’ आणि ‘भारत ज्योती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘अमेरिका – भारत व्यावसायिक परिषद’ या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
.........

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVOCK
Similar Posts
साहित्य अन् कलांच्या अधिष्ठात्री कला हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. कला, साहित्याच्या क्षेत्रातही भारतीय महिलांनी मोठी मजल मारली आहे. पारंपरिक ते आधुनिक, पाश्चात्य अशा सर्व कलाप्रकारांमध्ये त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. इतरांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या तिसऱ्या भागात
कुशल व्यवस्थापक कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना उत्तम व्यवस्थापन कौशल्य दाखवून देणाऱ्या स्त्रियांनी व्यावसायिक क्षेत्रातल्या व्यवस्थापनातही आघाडी घेतली आहे. छोट्या उद्योगांबरोबरच मोठे उद्योगही त्या समर्थपणे सांभाळत आहेत. आपल्या उद्योग-व्यवसायाला त्यांनी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. राजकारणातही केवळ दिखाऊ चेहरा
मैदानसम्राज्ञी भारतीय महिलांनी खेळाच्या मैदानावरही आपलं वर्चस्व सिद्ध करून, कुठल्याच क्षेत्रात आम्ही मागे नाही, हे दाखवून दिलं आहे. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या दुसऱ्या भागात जाणून घेऊ या खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणूनही खेळाचं मैदान गाजवणाऱ्या काही महिलांविषयी...
वेगळ्या वाटांवरच्या प्रवासी शिक्षणामुळे ज्ञानाची नवी कवाडं खुली झाल्यानंतर महिलांनी रुळलेल्या वाटा सोडून, नव्या वाटा धुंडाळायला सुरुवात केली. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ असं म्हणत कुढण्यापेक्षा, ‘माझी कहाणी मीच लिहिणार’ या जिद्दीनं त्यांनी वाटचाल सुरू केली. मग समाज, परंपरा, परिस्थिती, शारीरिक अपंगत्व यांसारखे अडथळेही त्यांची वाटचाल थोपवू शकले नाहीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language